अकोला - बाळापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या दोन निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार आमदार बळीराम सिरस्कार निवडून आलेले आहेत. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत सिरस्कार हॅट्ट्रिक मारतात काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवाराची विजयी हॅट्ट्रिक रोखण्यासाठी विरोधकांनीही कंबर कसली आहे. विद्यमान आमदारांनी विकास कामे केली असल्याचा दावा केला असला तरी विरोधकांनी त्यांच्या दाव्याला खोटे ठरवले आहे.
हेही वाचा - भिडेंनी तोडले अकलेचे तारे.. म्हणे एकादशीला अवकाशात यान सोडल्याने अमेरिका झाली यशस्वी
बाळापूर विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत 2 लाख 80 हजार मतदार होते. सध्या नव्या मतदारांची भर पडत ही संख्या 3 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामध्ये 1 लाख 47 हजार 47 पुरुष मतदार तर 1 लाख 32 हजार 214 स्त्री मतदारांची संख्या आहेत. तसेच बाळापूर विधासभा मतदारसंघामध्ये अंदाजे 40 हजार मुस्लीम तर 60 हजार माळी समाजाच्या मतदारांची संख्या आहे. यांच्यासह बौद्ध, कुणबी, पाटील यांची देखील अंदाजे 15 हजारच्या जवळपास मतदारांची संख्या आहेत. तसेच भोई, धनगर, मातंग, बंजारा, आदिवासी समजाची जवळपास प्रत्येकी दहा हजार लोकसंख्या आहे.
बाळापूर मतदारसंघामध्ये जलसिंचनाच्या कामांवर मोठा भर देण्यात आला आहे. त्यामुळे गावागावात पाणी ग्रामस्थांना मिळत आहे. तसेच रस्ते, विविध गावांमध्ये सार्वजनिक सभागृह यांचीही कामे झाली असल्याचा दावा आमदार बळीराम सिरस्कार यांनी केला आहे. तसेच पंचायत समिती, तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयाच्या इमारतींचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय पारस औष्णिक विद्युत केंद्राच्या विस्तारीकरणाचा एक टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार असल्याचेही म्हटले आहे. मात्र बाळापूर मतदारसंघ अजूनही विकासाच्या कोसो दूर असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच काही कामांमध्ये भष्ट्राचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
बाळापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसचे लक्ष्मणराव तायडे हे या मतदारसंघाचे आमदार होते. सन 2004 च्या निवडणुकीत भाजपचे नारायणगावकर यांनी विजय मिळवला होता. मात्र 2009 च्या निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाचे बळीराम सिरस्कार यांनी बाजी मारली. त्यांनी सलग दोनदा विजय मिळवला. बळीराम सिरस्कार हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही विजयाची हॅट्ट्रिक मारण्यासाठी उत्सुक आहे. मात्र विरोधकांनीही निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. विरोधकांमधून काँग्रेस उमेदवाराच्या शोधात आहे. तर भाजप-सेना युतीच्या पेचात पडली आहे. शिवाय युतीतील घटक पक्ष शिवसंग्राम देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र भाजप-सेना युतीच्या निर्णयानंतरच हा तिढा सुटणार आहे. असे असले तरी जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवाराची चाचपणी सुरु केली आहे. शिवाय विजयाचे दावे-प्रतीदावे देखील सुरु झाले आहे. त्यामुळे मतदारसंघामध्ये सध्या राजकिय धामधूम अनुभवास येत आहे.