अकोला - जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दोन हुंडी चिठ्ठी व्यावसायिकांवर कारवाई केली होती. या कारवाई संदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी संबंधित प्रकरण लपणार नसून योग्य ती कारवाई होईल, असा विश्वास वर्तवला आहे. तसेच हुंडी चिट्ठी व्यवसायासाठी नवीन कायदा आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे तीन पथकांच्या माध्यमातून संतोष राठी व राजेश राठी या दोन हुंडी चिठ्ठी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली होती. या दोघांकडून 35 लाख रुपये रोख आणि साडेचारशे धनादेश प्राप्त झाले. परंतु, या तिन्ही पथकांकडून जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांना अहवाल प्राप्त न झाल्यामुळे या दोन्ही हुंडी चिट्ठी व्यावसायिकांवर गुन्हे दाखल झाले नाही. त्यामुळे या कारवाईबद्दल संशयाचे वातावरण आहे.
संबंधित प्रकरणाबाबत पालकमंत्री बच्चू कडू यांनी नव्याने तक्रारी आल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई होईल, असे सांगून याबाबत नवीन कयदा करण्याची गरज असल्याचे बच्चू कडू म्हणाले.