अकोला - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचारी आपले कर्तव्य बजावून आपल्या घरी परत जात आहेत. यामुळेही रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बाहेरच राहाण्याची निवास व्यवस्था करण्यासाठी उपयोजना केल्या जात असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.
सोबतच या कर्मचाऱ्यांसाठी जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचवण्याचा प्रयत्नही करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ते बोलत होते. बैदपुरा, मोहम्मद प्लॉट, माळीपुरा या प्रतिबंधित क्षेत्रात स्वस्त धान्य घरोघरी देणार आहे. तसे नियोजन करण्यात येत आहे. कोअर एरियातून कोणी बाहेर येऊ नये. ते बाहेर आले तर बाहेरच त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करू, असेही बच्चू कडूंनी स्पष्ट केले.
बँकांची बैठक घेऊन, कोअर एरियात पैसे काढण्याची व्यवस्था करून तिथे एटीएमद्वारे पैसे पोहोचविण्यासाठी बैठक घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. रेड क्रॉस सोसायटी येथे रुग्णालय व रात्री फिरते रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. तसेच नवीन इमारतीत 120 बेडची व्यवस्था सुरू होईल. दोन शववाहिकाही तयार करण्यात येणार आहेत.
सोबतच एकाच दिवशी शंभर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत, असे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस उपस्थित होते.