अकोला - कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील रिक्षांची चाके थांबली आहेत. अशा परिस्थितीमध्ये रिक्षा चालक-मालक यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. चालक-मालक यांच्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी राज्यभर महाराष्ट्र असंघटित कामगार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद बदरूज्जमा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
राज्य शासनाने गेल्या 5 जूनपासून राज्यात अनलॉक प्रक्रिया हळूहळू सुरू केली आहे. मात्र, या प्रक्रियेत रिक्षा चालक आणि मालकंचा विचार करण्यात आला नाही. त्यातच रिक्षा चालकांसाठी प्रवासी वाहतूक करण्यासाठी जाचक अटी लागू केल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीस प्रतिबंध झाला असला तरीही रिक्षा चालकांच्या संसाराचे गाडा चालविण्यासाठीसुध्दा प्रतिबंध लागला आहे. आधीच बेरोजगार असलेल्या रिक्षा चालकांनी जमीन विक्री करून किंवा बँक कर्ज काढून रिक्षा खरेदी केली आहे.
लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांच्या कुटुंबावर उपासमार होत आहे. याच नैराश्यातून राज्यात नऊ लोकांनी आपली जीवनयात्रा संपविल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे अशा आत्महत्यामध्ये भर पडू नये यासाठी महाराष्ट्र रिक्षा चालक मालक यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचे हक्क अबाधीत राहावे म्हणून, स्वराज्य भवन मोहम्मद बदरूज्जमा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस महासचिव प्रकाश तायडे, युथ काँग्रेस अध्यक्ष महेश गनगने, मनपा विरोधी पक्षनेते साजीदखान पठाण, आटो युनियनचे अश्फाक लीडर, सेवा दलचे विजय शर्मा , नासीर खान शेर खान , हुसैन लीडर, इलियास खान लोधी, सह आटो रिक्षा चालक मालक संघटनेचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.