अकोला : अमरावती पदवीधर विधानपरिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून सुरुवातीपासूनच संघटनात्मक नियोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टिकोनातून पदवीधरांची नोंदणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात भाजपकडून राबविण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने पदवीधरांच्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात जुळविण्याचे बोलल्या जात आहे. संघटनात्मक कौशल्याच्या आधारावर भारतीय जनता पक्ष पुन्हा या निवडणुकीमध्ये बाजी मारणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासोबतच भाजपचे विद्यमान आमदार डॉ. रणजित पाटील यांनी पक्षासोबतच स्वतःचेही पदवीधरांचे जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे डॉ. पाटील हे या निवडणुकीत तिसऱ्यांदा विजयाची हट्रिक मारणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
उमेदवारी अर्ज भरला : बुलढाणा शिवसेना जिल्हाप्रमुख धीरज लिंगाडे यांनी पदवीधर मतदार संघात शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करीत उमेदवारीचे एबी फॉर्म घेऊन निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र, ऐन वेळेत काँग्रेसमध्ये आलेल्या लिंगाडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसमधील संघटन मजबूत करण्याचे आव्हान जास्त आहे. या तिन्ही पक्षाच्या वतीने पदवीधरांच्या संघटनेच्या संदर्भामध्ये ठोस पावले उचलल्या न गेल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय हा होईल यासंदर्भात शासकता निर्माण केल्या जात असल्याची परिस्थिती आहे. संघटनेचा अभाव आणि या तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांना प्रचारासाठी मनवायचे आव्हानच महाविकास आघाडीचे लिंगाडे यांना आहे.
इतर पक्षांकडून विजयाचा दावा : तर निवडणुकीत निवडुन येण्यापेक्षा किंवा प्रतिस्पर्धी उमेदवारांना कडवी टक्कर देण्यापेक्षा आपच्या उमेदवार भारती दाभाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल अमलकार यांना संघटन आणि पदवीधर मतदार जुळविण्याचे आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे पारडे जड आहे. परिणामी या निवडणुकीत भाजप वगळता इतर पक्षांकडून विजयाचा दावा करण्यात येत असला तरी त्यांना आपल्याकडील मतदारांची आकडेवारी जोडूनच विजयाचा अंदाज घ्यावा लागणार असल्याचे चित्र आहे.
डॉ. पाटील यांना निकटवर्तीयांचे आव्हान : भाजपचे आमदार डॉ रणजित पाटील यांना ज्यावेळी भाजप सेना सत्तेत असताना राज्यमंत्री पद दिले होते. त्यावेळी त्यांचे निकटवर्तीय शरद झांबरे पाटील हे होते. नंतर काही दिवसांमध्ये शरद झांबरे यांचे त्यांच्याशी काही कारणांनी वैर झाले. त्यामुळे भाजपमधूनच डॉ. पाटील यांना आव्हान देत शरद झांबरे यांनी त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमरावती पदवीधर मतदार संघात ते प्रचार करीत आहे. त्यांचा प्रचार हा सर्वात जास्त डॉ. रणजित पाटील यांच्या विरोधात असल्याचे चित्र आहे. परंतु, भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली नसल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.