अकोला - अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 17 जानेवारीला होणार आहे. 25 सदस्य असलेल्या भारिप-बहुजन महासंघाच्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, अपक्ष यांनी भाजपला सोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे समीकरण जुळल्यास भारिप बहुजन महासंघ सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. मात्र, या समीकरणाला तोंड देण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाने कंबर कसली आहे. सत्ता आपल्या हातून जाऊ नये, यासाठी ते सर्व प्रयत्न करत आहे.
मिनी मंत्रालयात पाचव्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाकडे 25 सदस्य आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना आता 2 सदस्यांची गरज आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचे मिळून 20 सदस्य होत आहे. तसेच भाजप सात सदस्य आणि अपक्ष मिळून सत्तास्थापनेसाठी ही आघाडी सुद्धा एकत्र येऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा - राजेंना कोणी पुरावे मागत असतील तर त्यांनी ते द्यावेत - नवाब मलिक
भारिप बहुजन महासंघाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेसोबत भाजप जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना मदत करेल का? याबाबत साशंकता आहे.
हेही वाचा - "इंदिरा गांधींबद्दल तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही"
भारिप सत्तास्थापनेसाठी काँग्रेसची मदत घेऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, भारिपकडून अध्यक्षपदासाठी नाव जाहीर झाले नसले तरी ऐनवेळी हे नाव जाहीर होऊन त्या सदस्याला पक्षश्रेष्ठी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आदेश येणार आहे.