अकोला - टाकाऊ पासून टिकाऊचा मंत्र देत पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संदेश डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. विदर्भातील दुष्काळी परिस्थितीत पर्यावरण संवर्धन करण्यासाठी काही नामी युक्त्या विद्यापीठाने तयार केल्या आहेत. या माध्यमातून वृक्ष लागवड आणि संवर्धनाची चळवळ राबवली जात आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या आवारभिंतीला लागलेल्या प्लास्टिक व सलाईनच्या बाटल्या, ट्री-गार्ड आणि झाडेही दृश्यमान मार्गावरून ये-जा करण्यासाठी नवीन आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये किंबहुना आणि पाणीटंचाईत झाडे कशी जगवावी, याचे प्रशिक्षण बघणाऱ्यांना विद्यापीठाकडून आपसूकच दिल्या जात आहेत. 'वेस्ट फॉर बेस्ट अशा या पद्धतीने हे वृक्ष जगविले जात असून नागरिकांनीही कमी पाण्यामध्ये झाडे जगविण्याचा हा प्रयोग करावा, अशी अपेक्षा विद्यापीठाच्या पुष्पशास्त्र व प्रांगणविद्या विभागाचे प्राध्यापक तथा शास्त्रज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहे.
कृषी विद्यापीठाच्या पुष्पशास्त्र व प्रांगणविद्या विभागाचे प्रमुख नितीन गुप्ता आणि सहयोगी प्राध्यापक रवींद्र राठोड यांनी विद्यापीठाच्या परिसरात ४ ते ५ हजार झाडे लावण्याचा विडा उचलला आहे. तसेच महामार्गालगतच्या विद्यापीठाच्या आवारात भिंतीलाही ३०० ते ४०० झाडे लावण्यात येणार असून पहिल्या टप्प्यामध्ये सव्वाशे झाडे लावली आहे. या झाडांना जगविण्यासाठी व संरक्षण मिळावे यासाठी ट्री गार्ड लावण्यात आले आहे. उष्ण तापमानात त्यांच्यामध्ये आद्रता निर्माण राहावी म्हणून प्लास्टिकच्या बाटल्या व सलाईनची नळी लावून त्या माध्यमातून झाडांना पाणी दिले जात आहे. त्यामुळे उष्ण तापमानातही ही झाडे अजूनही तग धरून आहेत. महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांना भविष्यकाळात ही झाडे सावली देणारी ठरणार आहेत. विद्यापीठाचा हा प्रयोग बघणार्यांसाठी आश्चर्यचकित करणारा आहे. कमी पाण्यात आणि उष्ण तापमानात झाडे जगविण्यासाठी विद्यापीठाकडून केलेला हा अभिनव उपक्रम वृक्षप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.