अकोला - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये भाजपने सेनेसाठी जिल्ह्यातील पाचपैकी दोन विधानसभा मतदारसंघ सोडावेत, या मागणीसाठी शिवसैनिकांनी शुक्रवारी बैठक घेऊन निर्णय घेतला. सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. मात्र, या बैठकीला जिल्हाप्रमुख नितीन देशमुख हे अनुपस्थित होते, हे विशेष.
भाजप-सेना युतीमध्ये जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी एक विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामुळे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले असून सेनेच्या 2 इच्छुक उमेदवारांना जिल्ह्यातील दोन मतदारसंघ मिळावेत. याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन निर्णय घेतला आहे.
तसेच अकोला पूर्व किंवा अकोला पश्चिम या मतदारसंघापैकी एक मतदारसंघ सेनेकडे देण्यात यावा, याबाबतही यावेळी निर्णय घेण्यात आला. ही बैठक सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजारकार यांच्या अध्यक्षतेखाली अकोला विश्रामगृह येथे पार पाडली.
विधानसभेत जिल्ह्यीतील शिवसेनेचा आमदार नसल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य लोकांची कामे होत नाहीत. मित्र पक्षाचे आमदार दुय्यम आणि हीन दर्जाची वागणूक देतात. याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांमधील असंतोषाचा उद्रेक होण्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यामुळे कोणत्याही परिस्थितीत शहरातील एक मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा, असा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. लवकरच सहसंपर्क प्रमुखांच्या नेतृत्वात अकोला पूर्व आणि पश्चिम विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहेत.