अकोला - युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे ज्या ठिकाणी थांबणार आहेत. त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्वागत कमान आणि स्वागत फलकावरून जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांचे छायाचित्र गायब करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या स्वागत कमानीवर आणि स्वागत फलकावर आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार बाजोरिया आणि युवा सेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप या गटाचे छायाचित्र दिसून आले. त्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जीवन उपयोगी साहित्य आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी देण्यात येणाऱ्या साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम मागच्या वर्षी घेतला होता. या कार्यक्रमात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे येणार होते. मात्र, त्यांचे ऐनवेळी काही कारणास्तव येण्याचे रद्द झाल्यामुळे या कार्यक्रमाला पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत यांची उपस्थिती होती. आमदार गोपीकिशन बाजोरिया, युवासेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप यांच्या गटाने दांडी मारली होती. त्यावेळी या दोन्ही गटाचा वाद मातोश्रीवर पोहोचला होता. तेव्हापासून या गटामध्ये लहानसहान कारणावरून वाद व्हायचे. मात्र, पक्षातील ही गटबाजी शिवसैनिकांसाठी संभ्रम निर्माण करणार आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेनिमित्त अकोल्यात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया, युवा सेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांनी लावलेल्या स्वागत कमानी आणि स्वागत फलकांवर जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांचे छायाचित्र गायब करण्यात आले. या प्रकारामुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा दिसून येत आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी शिवसेनेतील ही गटबाजी शिवसैनिकांसाठी संभ्रम निर्माण करणारी असली तरी या गटबाजीने शिवसेनेचे विधानसभेतील उमेदवार निवडून येतील का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
आमदार बाजोरिया यांनी गटबाजीचे पत्रकार परिषदेत केले होते खंडन -
शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जण आशीर्वाद यात्रेनिमित्त आमदार गोपिकीशन बाजोरिया, जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, सह संपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या समक्ष झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार बाजोरिया यांनी पक्षात कुठलीच गटबाजी नसल्याचे सांगितले होते. त्यांचे हे सांगणे बॅनर व शुभेच्छा फलकावरून खोटे ठरत असल्याचे दिसून येत आहे.