अकोला - एसटी प्रशासनाद्वारे झालेली कारवाई रद्द करुन देण्याच्या भुलथापा देऊन कर्मचार्यांकडून 74 हजार 400 रुपये जमा केल्या प्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी अजय गुजर या आरोपीला औरंगाबादेतून अटक केली आहे. तर दुसरा आरोपी प्रफुल्ल गावंडे हा पोलिसांना शरण आला. दरम्यान या प्रकरणात अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुगल पे, फोन पे वरुन असे जमा केले पैसे - एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून लढा देत होते. दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले. कर्मचार्यांकडून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना वकील म्हणून अजय गुजर यांनी नेमले. त्यानंतर मात्र, महामंडळाने कर्मचार्यांवर निलंबन, बदली आणि बडतर्फीची कारवाई केली. न्यायलयीन प्रक्रिया सुरू असताना अजय गुजरने राज्यातील सगळ्याच आगार कर्मचार्यांना पैसे जमा करण्यासाठी फोन केले. अकोट आगारातील कर्मचार्यांनाही व्हिडिओ कॉलवर फोन केला. त्याने अॅड. सदावर्ते यांना न्यायालयीन कामकाजासाठी पैशांची गरज असल्याने प्रत्येक कर्मचार्यांकडून 300 रुपये आणि निलंबित कर्मचार्याकडून 500 रुपये जमा करण्याचे सांगितले. त्यानुसार कर्मचार्यांनी पैसे जमा केले. अकोट आगारातील वाहक प्रफुल्ल गावंडेने अजय गुजरला फोन पे वरून 74 हजार 400 रुपये पाठविले.
गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटीलसह अजय गुजरवर झाला गुन्हा दाखल - या प्रकरणात विजय मालोकार यांनी 8 जानेवारी 2022 रोजी अकोट शहर पोलीस ठाण्यात अजयकुमार गुजर (45, रा. गट नं. 81, विनायक पार्कजवळ, देवळाई रोड, बिड बायपास, औरंगाबाद), अॅड. गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील, अकोट आगारमधील वाहक प्रफुल्ल गावंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी यामध्ये 11 एप्रिल रोजी 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला.
या घटनेनंतर अजय गुजरला अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि अकोट शहर पोलिसांचे पथक औरंगाबाद येथे गेले. त्यानुसार अकोला पोलिसांनी अजय गुजरला औरंगाबाद येथून अटक केली आहे. तर अकोट आगाराचे वाहक प्रफुल्ल गावंडे हा अकोला पोलिसांना शरण आला.
अजय गुजरला स्थानिक गुन्हे शाखा, अकोट शहर पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली. तर प्रफुल्ल गावंडे हा पोलिसांना शरण आला आहे. या दोघांची चौकशी करण्यात येणार आहे. प्रफुल्ल गावंडे यास अकोट शहर पोलिसांकडे सुर्पूद करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिली आहे.