अकोला - बियाणे व खते घेऊन जाणाऱ्या चालकाला अडवून त्याच्याकडून रोख रक्कम घेऊन पसार होणाऱ्या पाच दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून मुद्देमाल जप्त केला आहे. यातील एक आरोपी फरार झाला आहे. ही घटना चिखलगावसमोर घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेख मेहबूब अ. समद हे एक मे रोजी त्यांचे वाहन टाटा जीप मालवाहू एमएच- 03 - बिडी- 2035 ने एमआयडीसी येथून कृषी बियाणे व खते घेऊन पातूरमार्गे परभणी येथे जात होते. दरम्यान, रात्री पातूर रोडने चिखलगावसमोर दोन दुचाकी वाहनांवर सहा व्यक्ती आले. त्यांनी शेख मेहबूब यांचे वाहन थांबविले. त्यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल हिसकावला. याप्रकरणी त्यांनी पातूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पातूर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला.
स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तपासाची चक्रे वेगाने फिरविली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लखन गणेश गवळी, शंकर गणेश चौके, उमेश प्रफुल्ल मुंडे, सचिन प्रकाश सुरवाडे, रोशन उर्फ गोलू यशवंत मुंडे सर्व रा. राजंदा जि. अकोला यांना ताब्यात घेतले, तर नरेश मनोहर बघे, रा चिखलगाव, अकोला हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पकडलेल्यांची कसून चौकशी केली. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारांसह गुन्ह्यातील मुद्देमाल व 2 मोटारसायकल जप्त केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, जयंत सोनटक्के, संजय निखाळे, अश्विन मिश्रा, किशोर सोनोने, विशाल मोरे, अक्षय बोबळे, वसीम शेख, विरेंद्र लाड, लीलाधर खंडारे यांनी केली.