अकोला - टाळेबंदी खुली केल्यानंतरही राज्यातील मंदिरे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहेत. सणासुदीच्या दिवसात धार्मिक स्थळे पूर्ववत सुरू करण्यात यावी, यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने राजराजेश्वर मंदिर आणि देवी लाईनमधील संतोषी माता मंदिरात महाआरती आंदोलन करण्यात आले. यावेळी ढोल वाजवून विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.
टाळेबंदी खुली होताना बहुतांश सर्व सेवा पूर्ववत चालू करण्यात आल्या आहेत. असे असले तरी श्रद्धेचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या मंदिर, मठ व धार्मिक स्थळेही अद्यापही बंद ठेवण्यात आले आहेत. राज्यातील मंदिरे सुरू करावीत, अशी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी राजराजेश्वर मंदिर आणि अंबिका माता मंदिरात महाआरती केली. यावेळी विहिंपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोढिया, प्रकाश घोगलीया आदी उपस्थित होते. बजरंग दलाचे अध्यक्ष सूरज भगेवार म्हणाले, की ढोल वाजवा आणि सरकारला जागे करा, हे आम्ही आंदोलन करत आहोत. सरकारने मंदिरे बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय हा आडमुठा आहे. या निर्णयाचा निषेध करत आहोत.
यापूर्वी भाजपनेही केले होते आंदोलन-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मंदिरे सुरू करण्यासाठी सकारात्मक नाही. मात्र, मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. मद्यविक्रीने महसूल मिळत असला तरी मंदिर उघडल्यास भक्तांचा आशीर्वाद या सरकारला मिळणार असल्याचे विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सरकारने ही मंदिरे सुरू करावी यासाठी यापूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि भाजपने आंदोलन केले आहे. त्यांनतरही राज्य सरकारने मंदिरे सुरू केली नाहीत.