अकोला- पोकरा योजनेची जिल्ह्यात समाधानकारक काम झाले नाहीत. या कामांसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांना कृषिमंत्री दादा भुसे यांनी काही अडचणी आहेत का, असा प्रश्न विचारला असता तर अधिकाऱ्यांकडून त्याबाबत ही योग्य उत्तर त्यांनी दिले नाही. त्यावर कृषी मंत्री यांनी अधिकाऱ्यांना अहो जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, अशा शब्दात कृषी अधिकाऱ्यांचा आज समाचार घेतला.
जिल्ह्यातील पोकरा या योजनेचा आढावा घेताना कृषीमंत्री भुसे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यावर अकोला तालुका कृषी अधिकारी, एसडीओ यांनी असमाधानकारक उत्तरे दिली. त्यासोबतच मूर्तिजापूर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ही पोकरा योजनेतील प्रलंबित कामे लवकर पूर्ण करतो, असे सांगून कृषिमंत्री भुसे यांचा पारा चढविला. त्यावेळी त्यांनी जनाची नाही तर मनाची बाळगा असे म्हणत सर्वच अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.
जिल्ह्यातील पोकरा योजनेचा आढावा घेताना कृषीमंत्री भुसे म्हणाले की, राज्यातील 15 जिल्ह्यात हा प्रकल्प सुरु आहे. त्यात अकोला जिल्ह्याची प्रगती कमी आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामांना गती देणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या ग्राम ते जिल्हास्तरावरील यंत्रणांनी गती देऊन एका महिन्याच्या आत सर्व प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावे, असे निर्देश त्यांनी दिले. या कामात कुणीही हेतुपुरस्कर दिरंगाई करत असेल तर त्यावर कारवाई करा, असेही निर्देश त्यांनी दिले.
पोकरा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात तालुकानिहाय आढावा घेतल्यानंतर कृषीमंत्री भुसे म्हणाले की, यासंदर्भातील कार्यान्वीत यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः लक्ष घालून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा. ही योजना शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आहे. लवकरात लवकर प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.
यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोपिकीशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - अकोला: 'स्वाभिमानी'चे कृषी मंत्र्यांच्या ताफ्यासमोर मुगाचे पीक दाखवून आंदोलन