अकोला - हिवरखेड येथे ट्रक मधून शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी आणलेला खतांचा साठा तेल्हारा तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जप्त करण्यात आला. या बाबत तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी कृषी अधिकारी आणि हिवरखेड पोलिसांकडून सुरू आहे. आलेला खताचा साठा बनावट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत कुठलीही माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाही.
हिवरकर रस्त्यावर ट्रक (क्र. एमएच - 19 - जे - 0281) उभा करण्यात आला होता. या ट्रकमध्ये खताचा साठा असल्याची माहिती तेल्हारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने हिवरखेड पोलिसांना सोबत घेऊन हा ट्रक पोलीस ठाण्यात आणला. या ट्रकमध्ये तीन वेगवेगळ्या कंपनीच्या नावांची पोती मिळून आली. या पोत्यांमध्ये खतांचा साठा होता. या तिन्ही कंपनीच्या खत पोत्यांवर वेगवेगळी नावे आणि खाली मात्र एकसारखा मजकूर आढळून आला.
या पोत्यातील खतांचे नमुने कृषी विभागाकडून घेण्यात आले आहे. हा साठा नेमका कोठून आणला, याचा तपास घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हा साठा शेतकऱ्यांना कुठलीही परवानगी नसताना, विक्रीचा परवाना नसताना, कोणत्याच प्रकारचे बिल न देता विकण्यात येणार असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी, भरारी पथकाचे अधिकारी यांच्यासह इतर कृषी विभागाचे अधिकारी हिवरखेड येथे दाखल झाले आहेत. या संदर्भात कारवाई सुरू असून खटाचे कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले असल्याचे समजते. याबाबत हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही तेल्हारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी दिली आहे.