अकोला - अव्वाच्या सव्वा वीजबिलांमुळे मेटाकुटीला आलेल्या वीज ग्राहकांना राज्य सरकारने दिलासा देण्याची गरज आहे. मात्र, राज्यातील जनतेच्या हिताची भाषा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने अद्यापही याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या वतीने रविवारी नऊ ऑगस्टला आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षाचे अमरावती विभागीय संयोजक शेख अन्सार यांनी याबाबत शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पुढे ते म्हणाले, दिल्लीतील केजरीवाल सरकारने 200 युनिट वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना बिलात पूर्णपणे माफी दिली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये वीज माफी द्यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने महाराष्ट्रभर लावून धरली आहे. मात्र, राज्यातील जनतेच्या हिताची भाषा करणारी महाविकास आघाडी सरकारने अजून यावर निर्णय घेतला नाही.
लॉकडाऊनच्या काळात महावितरणच्या कर्माचाऱ्यांना घरोघरी जाऊन वीज मीटर रीडिंग घेता आलेले नाही. त्यामुळे महावितरण कंपन्यांकडून वीज ग्राहकांना जी वीजबिले पाठवण्यात आली आहेत, ती अव्वाच्या सव्वा आली आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये मोठ्या असंतोषाचे वातावरण आहे.
वीजबिलातून दिलासा मिळावा याच मागणीसाठी सत्तेत आपने आंदोलन करणे सुरू केले आहे. तरीही सरकारला जाग येत नसेल तर पुन्हा एकदा कुंभकर्णी झोपेचे नाटक करीत असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन सुरू करू, अशी माहिती अन्सार यांनी दिली आहे. यावेळी जिल्हा प्रभारी संयोजक अरविंद कांबळे, महानगर सहसंयोजक संदीप जोशी, महानगर सचिव गजानन गणवीर, ठाकुरदास चौधरी आदी उपस्थित होते.