अकोला - टाळेबंदीच्या काळातील चार महिन्याचे वीज बिल महावितरणने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दिले आहे. त्यामुळे दिल्ली सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने 200 युनिट पर्यंतचे वीज बिल माफ करावे, अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीने शिवसेनेचे आमदार गोपिकीशन बाजोरिया यांना आज दिले. या मागणीसाठी आम आदमी पार्टीने आमदार बाजोरिया यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले.
टाळेबंदीच्या काळात नागरिकांचा रोजगार गेला. व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. हातचे काम गेल्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अजूनपर्यंत व्यवसाय, नोकरी सुरू झाली नाही. त्यात महावितरणने वाढीव वीज बिल देऊन ग्राहकांना आर्थिक त्रास देण्याचा प्रकार केला आहे. याविरोधात आप ने आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये एक एप्रिलपासून केलेली वीज दरवाढ रद्द करा, निवडणुकीपूर्वी शिवसेनेने 300 युनिट पर्यंतचे बिल 30 टक्के कमी करणार असल्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, वीज बिलातील वहन आकार व सरकारचे वीज आकार रद्द करावे, वीज कंपनीचे सीएजी अंकेक्षण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आप ने आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात अमरावती विभाग संयोजक शेख अन्सार, संदीप जोशी, ठाकुरदास चौधरी, गजानन गणवीर, अरविंद कांबळे यांच्यासह आदी उपस्थित होते.