अकोला- अकोला पश्चिम आणि अकोला पूर्व या दोन मतदारसंघांमध्ये विरोधकांना भाजप उमेदवारांना हरवण्याचे आव्हान आहे. अकोला पश्चिमचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा हे सहाव्यांदा निवडणुकीला सामोरे जातील. तर, पूर्वचे आमदार रणधीर सावरकर हे दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावणार आहे. या दोन्ही मतदारसंघात विरोधकांजवळ एकही सक्षम पर्याय नसल्याने या दोघांना टक्कर देणारा एकही चेहरा नाही. त्यामुळे या दोघांचा विजय नक्की असल्याची चर्चा विधानसभा निवडणुकीपूर्वीच दोन्ही मतदारसंघांमध्ये रंगली आहे.
हेही वाचा - संतापजनक! मदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात दोन लाख 54 हजार 593 तर पूर्वमध्ये तीन लाख मतदार आहेत. यात नवमतदारांची भर पडणार आहे. पश्चिममधून गेल्या पाच निवडणुकांमध्ये भाजपचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा हे सतत निवडून येत आहेत. ते यावेळी पुन्हा उभे राहणार असल्याने त्यांचा विजय यंदाही निश्चित असल्याची चर्चा आहे. कारण की, या मतदारसंघात विरोधकांजवळ तगडा उमेदवारच नाही. यंदा शर्मा हे निवडणुकीला उभे राहणार नसल्याची चर्चा जोरात आहे. त्यामुळेच भाजपमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात डॉ. अशोक ओळंबे आणि मोतीसिंह मेहता आदींचा समावेश आहे. मेहता हे प्रबळ दावेदार असल्याचे बोलल्या जात आहे. भाजप-सेना युती न झाल्यास शिवसेनाही या मतदारसंघातून दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावणार आहेत. महापालिकेत या मतदारसंघातून शिवसेनेचे सात नगरसेवक आहेत. तसेच 2014मध्ये शिवसेनेच्या उमेदवार राहिलेले राजेश मिश्रा हे याही वेळेस मैदानात उतरण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय देशमुख हे दुसऱ्या क्रमांकावर होते. परंतु, त्यांनी या निवडणुकीत उभे राहणार नसल्याचे पक्षाकडे सांगितल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कडुन दुसरा नेता कोण, असा प्रश्न या मतदारसंघात उपस्थित झाला आहे. वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघातून कोणला उमेदवारी देते, याबाबत कुठलाच खुलासा झालेला नसला तरी मुस्लिमबहुल मतदारसंघ असलेल्या अकोला पश्चिममधून वंचित बहुजन आघाडी मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - दिवाळीपूर्वीच निवडणुका; २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ला मतमोजणी
अकोला पूर्व मतदारसंघातून भारिप बहुजन महासंघाचे हरिदास भदे हे दोन वेळा निवडून आले आहेत. 2014 च्या निवडणुकीत त्यांचा अडीच हजार मतांनी भाजपच्या रणधीर सावरकरांनी पराभव केला होता. भाजपचे आमदार सावरकर यांच्या विजयामुळे अकोला पूर्व मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीची पकड कमी झाली आहे. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोण उमेदवार देणार, याबाबत कुठलाच निर्णय झालेला नाही. तरी, माजी आमदार हरिदास भदे यांच्या उमेदवारीवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा राज ठाकरेंना कार्टूनमधून चिमटा!
सध्याचा अकोला पूर्व मतदारसंघ हा आधीचा बोरगाव मतदारसंघ होय. त्यावेळी हा शिवसेनेच्या ताब्यात होता. यावेळी युती झाल्यास हा मतदारसंघ शिवसेनेला सुटतो का, याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. विरोधकांकडे सक्षम उमेदवार नसल्याने भाजपही आपला दावा सांगत आहे. भाजपची दोन्ही मतदारसंघांत चांगली पकड आहे. परिणामी येथे निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झालेच, तर अकोला पश्चिममधून भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा हे सहाव्यांदा निवडून येणार आहेत.