अकोला - अतिविषारी असलेल्या तांब्या कोब्रा जातीच्या सापाला सर्पमित्राने जीवदान दिले आहे. सिंधी कॅम्प येथील कवाडे नगर मधील एका घरातील पाण्याच्या टाकीमध्ये हा साप पडला होता. साप टाकीत पडल्याचे दिसताच घरमालकाने सर्पमित्राला बोलावले. सर्पमित्र शेख करीम यांनी या सापाला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढत जीवदान दिले.
सिंधी कॅम्प परिसरातील कवाडे नगरात गुलाबराव वानखडे यांचे घर आहे. त्यांच्या घरातील पाण्याच्या टाकीत कोब्रा जातीचा साप पडला होता. पाण्याच्या टाकीत साप आढळल्याने वानखडे यांनी सर्पमित्रांना बोलवले, सर्पमित्र शेख करीम यांनी या सापाला पाण्याच्या टाकीबाहेर काढून जीवदान दिले आहे.
विषारी साप
कोब्रा जातीतील तांब्या हा साप अतिशय विषारी आहे. या सापाच्या दंशानंतर योग्य उपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. या जातीतील साप अतिशय चपळ असतात, धोक्या जाणवल्यास ते लगेच हल्ला करतात. या सापाची लांबी 5 ते 9 फुटांपर्यंत असू शकते अशी माहिती सर्पमित्र करीम यांनी दिली. दरम्यान शेख करीम यांनी पकडलेला हा साप त्यांनी लगेच सुरक्षीत अधिवासात सोडला आहे. याची नोंद वनविभागाच्या नोंदवहीमध्ये देखील करण्यात आली आहे.