अकोला - शेगाव येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनात 3 वर्षाचा बाहुबली रेडा आकर्षण ठरत आहे. या रेड्याचे वजन तब्बल 2 हजार किलो आहे. या रेड्याला पाहण्यासाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी होत आहे. या प्रदर्शनीत हा महाकाय रेडा तंत्रज्ञान, शेती अवजारे, फळबागांचे तंत्रज्ञान यापेक्षा भाव खाऊन जात आहे.
हा रेडा गीर-जाफराबादी जातीचा आहे. रवीण बानोले यांनी तो 11 महिन्याचा असताना त्याला 4 लाख रुपयांत राजस्थानातून खरेदी केले होते. हा रेडा आता परिपक्व झाला आहे. या रेड्याचे वय 3 वर्षे आहे. त्याला सध्या 4 दात आहेत. रेड्याच्या खुराकासाठी रोज 3 हजार रुपये खर्च आहे. तसेच त्याला एक पोते ढेप आणि औरंगाबाद किंवा मुंबई येथून आणलेली मूरघास हे खाद्य लागते. रोज 100 किलो मूरघास त्याला लागते.
हेही वाचा - चंद्रपुरातील आदिवासी माना जमातीचा नागदिवाळी उत्सव, 'असा' करतात साजरा
या रेड्याचे वैशिष्ट्य म्हणजे, तो ब्रीडिंगसाठी उपयुक्त आहे. प्रवीण बानोले हे या रेड्याचे ब्रीडिंग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून तयार करणार आहेत. ब्रीडिंगचे इंजेक्शन तयार करून ते परदेशात विकण्यात येणार आहे. आठवड्यातून दोन वेळा त्याला ब्रीडिंगसाठी तयार करण्यात येते. त्यामुळे हा रेडा सध्या तसाही भाव खात आहे. हा रेडा दाखल झाल्यानंतर त्याला पाहण्यासाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली. एकंदरीत रेड्याच्या या वैशिष्ट्यांमुळे खऱ्या अर्थाने तो बाहुबली ठरला आहे.