अकोला - विविध सामाजीक संघटनांकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल १ किमी राष्ट्रध्वजाची यात्रा काढण्यात आली. नॅशनल इंटिग्रिटी मिशन, वंदे मातरम संघटना, हुशे बंधू ज्वेलर्स, नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ यासह इतर संघटना यात सहभागी होत्या. गुरुवारी सकाळी गोरक्षण रोड येथून निघालेली यात्रा अकोला क्रिकेट क्लब या ठिकाणी यात्रेचा समारोप झाला.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानिमित्त या संघटनांनी आगोदरही विविध उपक्रम केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने विश्व विक्रमी भारताचा सर्वात मोठा ध्वज, शंभर फूट उंचीचे अब्दुल कलाम यांचे तैलचित्र, एक एकरमध्ये देशभक्तीची काढलेली रांगोळी, यासोबतच ७६ मीटर लांबीचा केक, तिरंगी पोशाखातील मोटारसायकल रॅली, तिरंगी एअर शो अशी विविध उपक्रम प्रत्येक स्वातंत्र्यदिनी घेण्यात आलेले आहेत. यावर्षी मात्र या संघटनांतर्फे एक किलोमिटर लांबीची तिरंगा ध्वज यात्रा आयोजीत केली होती. ढोल-ताशांच्या गजरात शहरातील मुख्य रस्ते आणि चौकातून यात्रा काढून ही यात्रा पार पडली. या उपक्रमामध्ये विविध शाळेतील विद्यार्थी, विविध युवकांच्या संघटना, युवतींच्या संघटनांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यामध्ये भाग घेतला. यात्रा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.