शिर्डी(अहमदनगर) - राहुरी तालुक्यातील गुंजाळे परिसरामध्ये गावठी कट्ट्यातून गोळीबार (Pistol Shooting) होऊन 25 वर्षीय तरूणाचा मृत्यू (Youth Death in Rahuri) झाला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. ही गोळी कोणी झाडली? ही आत्महत्या आहे का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. याप्रकरणाचा राहुरी पोलीस (Rahuri Police) अधिक तपास करत आहेत.
- हत्या की आत्महत्या?
मिळालेल्या माहितीनुसार, आज (31 जानेवारी) सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील टेलरींग काम करणारा प्रदीप एकनाथ पागिरे हा तरुण आपल्या दुकानात काम करत होता. यावेळी अचानक दुकानातून गोळीबार झाल्याचा आवाज आला. या आवाजाने ग्रामस्थ तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी दुकानात धाव घेतली. त्यावेळी प्रदीपच्या छातीत गोळी घुसून तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्यास तत्काळ रुग्णालयात हलवले. मात्र, त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
- पोलीस तपास सुरू -
घटनेची माहिती समजताच श्रीरामपुर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. घटनेच्या अगोदर त्याचा मित्र आणि तो बरोबर असल्याची घटनास्थळी चर्चा होती. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहेत. सदर तरुणाने आत्महत्या केली की चुकून गोळी सुटून त्याचा मृत्यू झाला, की त्याच्या मिञाकडून गोळी झाडली गेली याबाबत चर्चेला उधाण आले होते. पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.