अहमदनगर - राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी नुकतीच शिर्डीला ' झिरो क्राईम सिटी' करण्याची केलेली घोषणा हवेतच विरली आहे. शिर्डीतील शिवाजीनगर भागातील हॉटेल पवनधाम येथे तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. प्रतिक वाडेकर (२०) असे मृत तरुणाचे नाव आहे. सनी पोपट पवार असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर इतर तिघे आरोपी फरार आहेत.
मृत प्रतिक (रा. लक्ष्मीनगर, शिर्डी ) हा बाहेरगावी शिक्षणासाठी राहत होता. चुलत्याच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी तो शिर्डीत आला होता. मृत प्रतिक वाडेकर, त्याचा चुलत भाऊ नितीन वाडेकर यांच्यासह पाच जणांनी फ्रेश होण्यासाठी हॉटेलमध्ये रुम भाड्याने घेतली होती. रुममध्ये देशी पिस्तुलातून गोळी झाडत प्रतिकची हत्या करण्यात आली. घटनेनंतर चौघेही हॉटेलच्या रुममधून फरार झाले. हॉटेल मालकाने रुममध्ये प्रतिकला जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांना तातडीने घटनेची माहिती दिली. विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली.
चेष्टामस्करीच्या नादात गोळी लागली की खून ?
मृत प्रतिक वाडेकर आणि चुलत भाऊ नितिन वाडेकर तसेच अन्य तीन नातेवाईक यांची रुममध्ये चेष्टा सुरू होती. त्या नादात प्रतिकला गोळी लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र फरार आरोपीच्या अटकेनंतर व पोलीस तपासानंतरच खरे कारण समोर येणार आहे.
शिर्डीसारख्या धार्मिक तीर्थस्थळी देशी कट्टे येतात कसे ?
पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी तीन पोलीस पथके रवाना केली आहेत. शिर्डीसारख्या धार्मिक तीर्थस्थळी देशी कट्टे येतात कसे ? हा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहे. शिर्डीत गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.