अमरावती - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत आज परीक्षा केंद्रावर परीक्षेची वेळ उलटल्यावरही प्रश्नपत्रिका पोचल्या नसल्याने चांगलाच गोंधळ उडाला. परीक्षार्थींना परीक्षेसाठी दिलेले केंद्रही ऐन वेळेवर बदलल्याने परीक्षार्थींची चांगलीच तारांबळ उडाली.
आज एम.ए प्रथम वर्षाचे मराठी वाङ्ममय आणि इंग्रजी वाङ्ममय असे दोन पेपर होते. श्री शिवाजी बहुद्देशिय महाविद्यालय यासह श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय आणि श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय ही परीक्षाकेंद्रे ज्या परीक्षार्थींना देण्यात आली होती. त्यापैकी अनेकांना ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलले असल्याचे सांगितल्याने मोठा गोंधळ उडाला.
श्री शिवाजी बहुद्देशी महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर एका बाकावर एक मराठी वाङ्ममय आणि एक इंग्रजी वाङ्ममयाच्या परिक्षार्थीस बसविण्यात आले. साडेतीन वाजता इंग्रजी वाङ्ममयाच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर आल्या. इंग्रजी वाङ्ममयाचे परीक्षार्थी पेपर सोडवायला लागले असताना मराठी वाङ्ममयाचे परीक्षार्थी मात्र, प्रश्नपत्रिका कधी येणार याची वाट पाहत बसले होते. ४ वाजल्यानंतर मराठी वाङ्ममयाच्या प्रश्नपत्रिका परीक्षाकेंद्रांवर आल्या. दरम्यान अडीच वाजता सुरू होणारी परीक्षा ४ वाजता सुरू झाल्याने बाहेर गावावरून परीक्षा देण्यास आलेल्या परीक्षार्थ्यांना ७ वाजता पेपर सुटल्यावर रात्री उशिरा गावी जावे लागणार आहे.