अहमदनगर - गणेश सहकारी साखर कारखाना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने चालवण्यास घेतलेला आहे. हा कारखाना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघामध्ये येतो. गणेशच्या सेवानिवृत्त कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम तीस दिवसांच्या आत देण्याचे निर्देश अहमदनगरच्या कामगार न्यायालयाने दिल्याने कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विखे पाटलांच्या शिर्डी मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने १६ एप्रिल २०१४ रोजी एका करारान्वये भागीदारी तत्त्वावर चालवण्यास घेतला. गणेश कारखान्याची एकूण देणी ३३ कोटी ३३ लाख ७९ हजारांची होती. ही देणी देण्याचे यावेळी विखे कारखान्याने मान्य केल्याचे सांगत सेवानिवृत्त १२० कामगारांची अंतिम देयके, देयकातील फरक, रिटेन्शन, भविष्य निर्वाह निधी, बोनस आदी मिळून जवळपास ३० कोटींची देणी थकीत होती. करार करणाऱ्या डॉ. विखे कारखान्याने सेवानिवृत्त कामगारांना एकरकमी निर्वाह निधी देण्याचे या करारान्वये कबुल केल्याचे कामगारांचे म्हणने होते. कामगारांनी आपली देणी कारखाना व कामगार आयुक्त यांच्याकडे मागण्यास सुरुवात केली. ही देणी न दिल्याने सत्तावीस कामगारांनी न्यायालयात धाव घेतली होती.
27 कामगारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आपल्या पैश्याच्या मागणीसाठी याचीका दाखल केली होती. न्यायालयाने याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त आणि नाशिक येथील विभागीय कामगार आयुक्त यांना ६० दिवसांच्या आत या कामगारांचा निकाल देण्यास फर्मावले होते. सहाय्यक कामगार आयुक्त व विभागीय कामगार आयुक्त तसेच नियंत्रक संस्था म्हणुन सदरचा दावा अहमदनगरच्या कामगार न्यायालय वर्ग केला होता. त्याची सुनावणी नुकतीच पूर्ण होऊन या न्यायालयाने गणेश सहकारी कारखाना व्यवस्थापनास तीस दिवसांच्या आत कामगारांना त्याच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम अदा करण्यास फर्मावले आहे. न्यायालयाच्या या आदेशाने कामगारांना दिलासा मिळाला आहे.