अहमदनगर - लोणी-कोल्हार रोडवरील डॉ. आंबेडकर महाविद्यालयासमोरील लाकडाच्या वखारीस रविवारी अचानक आग लागली. यामध्ये आगीने रौद्र रुप धारण केल्याने लाकडांचा जळून कोळसा झाला. या आगीमध्ये प्रचंड नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बाबुलाल देवजी पोकार यांची ही लाकडाची वखार आहे. वखारीला लागलेल्या आगीत पत्र्याचे शेड आणि मशिनरीचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये जीवितहानी मात्र झाली नाही. वखारीतील लाकडे एकावर एक रचून ठेवलेली असल्याने वरुन पाणी मारून आग विझवली तरी काही वेळाने खालच्या लाकडांमध्ये आग लागत होती. वारा असल्याने आग आणखीच पसरत होती. त्यामुळे परिसरात धुराचे प्रचंड लोळ होते.
घटनेची माहिती कळताच विखे कारखाना, देवळाली, राहता, राहुरी आणि श्रीरामपूर पालिकेचे अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. जवळपास ३ तास पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.