अहमदनगर - एकिकडे मुंबई आणि कोकणात धुवाधार पाऊस होत असताना राज्यातील काही भागात आजही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस पडावा यासाठी महिलांनी डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन वाजत गाजत मिरवणूक काढली आणि धोबी समाजातील व्यक्तीला जलाभिषेक केला. परिसरात पाऊस पडावा यासाठी ही आगळी वेगळी परंपरा या गावात बघायला मिळाली आहे.
परिसरात धो-धो पाऊस पडावा यासाठी धोब्यालाच अंघोळ घालण्याची आगळी वेगळी प्रथा एका गावात बघायला मिळाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. पाऊस यावा यासाठी अनेक ठिकाणी महादेवाला पाण्यात ठेवले जाते, सामुदायिक प्रार्थना केली जाते, होम हवन केले जाते, बेडकांचे लग्न लावण्याचीही प्रथा आहे. मात्र श्रीरामपूर तालुक्यातील माळवडगाव येथे आज एक अनोखी प्रथा बघायला मिळाली.
येथे पाण्याने भरलेले हंडे डोक्यावर घेतलेल्या महिलांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणी भवानीमातेच्या मंदिरासमोर धोबी समाजातील किसन त्रिभुवन यांचे पूजन करत त्यांना अंघोळ घातली. गावावर चांगला पाऊस व्हावा हिच भोळी भावना या नागरिकांची आहे. हा आगळा वेगळा प्रसंग बघायला संपूर्ण गावाने गर्दी केली होती.