अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील पठार भागाला तर दुष्काळ हा पाचवीला पुजलेला असतो. सध्या याठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची सोय होणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे. यावर्षी उद्भवलेल्या प्रचंड दुष्काळाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पठार भागातल्या गावांतील हजारो महिला दररोज शेतावर मोलमजुरी करण्यासाठी शेजारच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याला जात आहेत.
पठार भागातील बोटा, कुरकुटवाडी, भोजदरी, सारोळेपठार, केळेवाडी, अकलापूर, आंबी-दुमाला, नांदूरखंदारमाळ, डोळासणे, हिवरगाव पठार, पिंपळगावडेपा, गुंजाळवाडी, वरुडीपठार, दरेवाडी यांसह या गावांच्या आसपास राहणाऱ्या आदिवासी वाड्या वस्त्यांतील महिला दररोज सकाळी रोजंदारीसाठी घरातून बाहेर पडत आहेत. संगमनेर तालुक्यातील प्रवरा आणि मुळा नदी काठचापट्टा सोडल्यास उर्वरित भागाला यंदा अत्यल्प पावसामुळे दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात आहेत.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, ओतूर, आळेफाटा, बेल्हे या ठिकाणच्या बागायती शेतांवर मजुरीसाठी या महिला जातात. यासाठी पठारभागातल्या प्रत्येक गावातून आणि वाडीतून दररोज सकाळी नऊ वाजता महिला कामगारांची ने-आण करण्यासाठी गाडीची व्यवस्था केलेली असते. प्रत्येक गाडीत साधारणतः तीस ते चाळीस महिला कामगार घेऊन ही गाडी ठरलेल्या ठिकाणी त्यांना सोडते आणि संध्याकाळी पुन्हा त्याच ठिकाणाहून त्यांना परत आणण्याची व्यवस्था केली जाते. महिलांकडून काम करून घेणाऱ्या बागायतदाराकडून या महिलांना प्रत्येकी दीडशे रुपये रोज दिला जातो आणि त्यांची ने-आण करणाऱ्या वाहन चालकास पन्नास रुपये प्रति महिला असे गाडी भाडे देण्यात येते.