अहमदनगर - सैराट चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेल्या आकाश ठोसर याच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडून महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अहमदनगर सायबर पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शिवदर्शन उर्फ शिवतेज नेताजी चव्हाण असे या आरोपीचे नाव असून तो पिंपरी-चिंचवड शहरात राहतो.
आरोपी शिवदर्शनने सैराट फेम आकाश ठोसर याच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले होते. त्याची चार महिन्यांपूर्वी अहमदनगरमधील एका महिलेशी या माध्यमातून ओळख झाली. तो त्या महिलेशी चॅटिंग करत असे. यातून त्याने त्या महिलेचा विश्वास संपादन केला. यानंतर त्याने आर्थिक अडचण असल्याचा बहाणा करत त्या महिलेकडून मंगळसूत्र आणि एक अंगठी अहमदनगर येथे येऊन घेतली.
शिवदर्शनने त्यानंतर आपले बनावट फेसबुक अकाऊंट बंद केले. तेव्हा महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तेव्हा तिने अहमदनगरच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली. तिच्या तक्रारीवरुन सायबर सेलने या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.
पोलिसांनी आरोपी शिवदर्शन याला पिंपरी-चिंचवडमधून अटक केली. यासोबत पोलिसांनी आरोपीकडून मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी असे मिळून एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, या बनावट खात्याद्वारे त्याने अनेक महिला आणि तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - अहमदनगरमध्ये कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५४, अठरा जणांवर उपचार सुरू
हेही वाचा - भरधाव ट्रकने चेकपोस्टला उडवले, कर्तव्यावर असणारा एक जण जखमी