शिर्डी (अहमदनगर) - राहाता तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व खबरदीचा उपाय म्हणून राहाता तालुक्यातील सर्व प्रमुख गावातील आठवडे बाजार व जनावरांचा बाजार 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश तहसीलदार कुंदन हिरे यांनी आज जारी केला आहे.
गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी राहाता व शिर्डी नगरपालिका कार्यक्षेत्र, संपूर्ण ग्रामीण भागात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये भरणारे जनावरांचे बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा बाजूस बसणारे तात्पुरते फेरीवाले, भाजीपाला व फळ विक्रेत्याबाबत स्थानिक प्राधिकरणाने योग्य ती दक्षता घेवून त्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत. हा बंदी आदेश येत्या 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहणार असल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.
हेही वाचा - चिंताजनक..! नागपुरात नवीन वर्षात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा मोठा
राहाता तालुक्यातील अधिकृत रुग्णसंख्या अडीचशेपर्यंत पोहचली आहे. शिर्डीत शुक्रवारी सायंकाळपर्यंत 81 नागरिक कोरोनाग्रस्त झाले होते तर राहात्याने पन्नाशी व लोणीनेही पस्तीशी ओलांडली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात रुग्ण तपासणी न करून घेता घरीच उपचार घेत आहेत. तपासणी होऊन समोर येणाऱ्या रुग्णांपेक्षा हे प्रमाण कितीतरी अधिक असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मास्क वापरासाठी पोलीस व स्थानिक प्रशासन दंडात्मक कारवाया करत असतानाही काही नागरिक बेफिकीरीने वागताना दिसत आहेत. राहाता तालुक्यात कोरोनाने आजवर साठ नागरिकांचे प्राण हिरावले आहेत.