अहमदनगर - ससेवाडी (ता. अहमदनगर) येथील प्रकाश काळे हा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान पाकिस्तानी महिला एजंटाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला असल्याची माहिती पुढे आल्याने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये पाक सीमेवर तैनात असताना त्याच्याकडून बीएसएफच्या हालचालींची माहिती लीक झाल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी काळे याला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. मात्र, याबाबत काळे याच्या मूळगावी ससेवाडी येथे माहिती घेतली असता काळे याचे वडील ज्ञानदेव देवराम काळे यांनी, याबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले. आम्हाला कुणाही सरकारी अधिकाऱ्याचा फोन आला नसल्याचे ते म्हणाले.
आम्हाला फक्त फोन करून पत्नी आणि दोन मुलांना लवकर घेऊन जा, एका फोटोमुळे चौकशी सुरू आहे, असे कळल्याने आम्ही आमच्या धाकट्या मुलाला, सून आणि दोन मुले आणण्यासाठी पंजाबला पाठवले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. गावात नागरिकांशी चर्चा केली असता नेहमी देवधर्म करणारे काळे यांचे गरीब कुटुंब असल्याचे कळाले. केवळ अडीच एकर शेती असून वारकरी संप्रदाय मानणारे आणि गावात कुणाशी तंटा नसणारे हे कुटुंब असल्याची माहिती मिळाली. मात्र, सध्या प्रकाश काळे यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चेसंबंधी कोणीही ग्रामस्थ बोलण्यास तयार नव्हते.
काय केले या जवनाने?
नगर तालुक्यातील ससेवाडीतल प्रकाश काळे बीएसएफमध्ये कार्यरत आहे. 2019 पासून तो पंजाबमध्ये नियुक्तीला आहे. फेसबुक आणि व्हॅटसएॅपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पाकिस्तानी महिलेशी (एजंटाशी) त्याचा संपर्क झाला. त्यानंतर काळे याने बीएसएफच्या काही जवानांचा व्हॉट्सएॅप ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये त्याने पाकिस्तानी महिला एजंटालाही समाविष्ट केले. त्यामुळे ग्रुपमध्ये पोस्ट केली जाणारी माहिती तिला आपोआप कळत होती. कोणाच्या नियुक्त्या कोठे आहेत, काय हालचाली होणार आहेत, गस्त कोठे असणार आहे, ही सर्व माहिती जवान ग्रुपवर एकमेकांना देत असत. ती माहिती त्या महिलेला मिळत होती. ऑगस्ट महिन्यापासून हा प्रकार सुरू होता.
पंजाब स्टेट ऑपरेशन सेलने केली कारवाई
या हेरगिरीची माहिती कळाल्यानंतर बीएसएफ आणि पोलिसांनी काळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. माहितीत तथ्य आढळल्यानंतर चौकशीअंती पंजाब पोलिसांच्या स्टेट ऑपरेशन सेलने काळे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 30 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
काळेच्या कृत्याबद्दल नागरिक अचंबित
अहमदनगर तालुक्यातील ससेवाडी हे एक छोटेसे गाव आहे. तेथील मूळ रहिवासी असलेल्या प्रकाश काळेचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. धार्मिक प्रवृत्तीच्या घरात वाढलेल्या प्रकाश काळे याने असे का केले, याबाबत नागरिक अचंबित झाले आहे. ही सर्व कारवाई पंजाबमध्ये सुरू असल्याने आणि संवेदनशील असल्याने याबाबत नागरिक अधिक बोलण्यास तयार नाहीत.
हेही वाचा - आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आले का; अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला संतप्त सवाल
हेही वाचा - पाक सीमेवर तैनात अहमदनगरचा बीएसएफ जवान अडकला पाकिस्तानच्या 'हनी ट्रॅप'मध्ये