अहमदनगर Ahmednagar Politics : मंगळवारी झालेल्या विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांच्या चार वर्षाच्या कारकिर्दीचे भरपूर भरभरून कौतुक केलं. तुम्हाला पाहिजे ती मदत मी करतो, तुमची गॅरंटी मी घेतलेली आहे असं जाहीर वक्तव्य विखेंनी केलं होतं. तुम्ही फक्त काम करत राहा, कुणाची कशी जिरवायचा ते माझ्यावर सोडा असे म्हणत विखेंनी कोल्हे यांना एकप्रकारे इशाराच दिला होता. आज त्यालाच विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी पत्रकार परिषदेमध्ये सडेतोड प्रतिउत्तर दिलं आहे.
विखे ज्यांची गॅरंटी घेतात त्यांचा पराभव होतो : विखे यांनी मामा म्हणून 2019 ला आमच्या उमेदवाराची (माजी आ.स्नेहलता कोल्हे) गॅरंटी घेतली होती. मात्र दुसरीकडे आपल्या मेहुण्यांना अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरवल्याने आमचा पराभव झाला. त्यामुळे विखे ज्यांची गॅरंटी घेतात त्यांचा पराभव होतो. हे आमच्या विरोधकांनी (आ.आशुतोष काळे) लक्षात घेऊन आनंद साजरा करायचा की दुःख याचा विचार करावा. विखे यांची गॅरंटी म्हणजे चायनामेड गॅरंटी आहे. आमच्या विजयासाठी आमची गॅरंटी कुणाला घेण्याची गरज नाही. कोपरगावची तीन साडेतीन लाखांची मतदार जनता ती गॅरंटी घेईल असा विश्वास कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.
अद्याप महायुतीचे जागावाटप नाही : आमची विजयाची गॅरंटी केवळ कोपरगावची जनता नाही तर शेजारच्या राहता तालुक्यातील आमचे हितचिंतकही घेतील असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला. तसेच आपणही राहत्यात लक्ष घालून आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला. मुळात विखे हे राज्याचे नेते आहेत, मंत्री आहेत. अद्याप महायुतीचे जागावाटप झाले नाही. अशात त्यांनी वेगळ्या पक्षाच्या उमेदवाराची गॅरंटी घेणं ठीक नसल्याचं कोल्हे म्हणाले. त्यांनी आता आमच्या विरोधात मोट बांधली आहे हे स्पष्टच झाल्याचा आरोप विवेक कोल्हे यांनी केला.
उभे राहून छातीवर वार झेलू : आमदार आशुतोष काळे यांचे नाव न घेता कोल्हे यांनी, आमच्या विरोधकांनी जरी त्यांच्यापुढे गुडघे टेकून शरणागती पत्करलेली असली तरी, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही उभे राहून छातीवर वार झेलू, असे सांगत आता आपणही विखे यांच्या विरोधात उभे ठाकले आहोत. गणेश कारखान्याची निवडणूक ही सहकाराची निवडणूक होती. त्यामुळे आम्ही कुणाचेही बोट धरलेले नाही असेही त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल सांगितलं. निवडणूक संपली, आता तो विषय आमच्यासाठी संपलेला आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
कोपरगावची जनता निश्चित विचार करणार : विखे घराण्यात 25-25 वर्ष खासदारकी राहिलेली आहे. गेली 35 वर्ष त्यांच्याकडे लाल दिवा आहे. मात्र जावई म्हणून त्यांनी कोपरगावच्या जनतेला काय दिलं हे येथील सुज्ञ जनता जाणून आहे. आता मंत्री झाल्यानंतर दोन वर्षांनी त्यांना कोपरगावची आठवण येते, याचाही कोपरगावची जनता निश्चित विचार करेल असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला. आम्ही पक्षाचे गेले दहा वर्षे प्रामाणिकपणे काम केलेले आहे. पक्ष ते बघत आहे. त्यामुळे गॅरंटीच्या गप्पा त्यांनी मारू नये. इतर कुणाची गॅरंटी घेण्यापेक्षा ज्याने-त्याने आपापली गॅरंटी घेतली तरी पक्षाचे खूप उमेदवार निवडून येतील. तसेच राज्यात स्वबळावर सरकार येईल असा विश्वास व्यक्त करतानाच विखे यांना खोचक टोला लगावला.
हेही वाचा -
विखे पाटलांचा आमदार आशुतोष काळे यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा
Crop insurance : विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येतील तफावत खूप मोठी - राधाकृष्ण विखे