शिर्डी - पाणी टंचाईमुळे धादवडवाडीचे ग्रामस्थ पाणी टंचाईला तोंड देत होते. मात्र पाणी टंचाईवर कोणतीही उपाययोजना शासनाकडून करण्यात येत नव्हती. तीन ते चार किमीवरून डोक्यावर पाणी आणून महिला शेतातील कामाला जात होत्या. अखेर ग्रामस्थांनी यावर तोडगा काढत लोकवर्गणीतून पाईपलाईन करून पाणी टंचाईवर मात केली.
संगमनेर तालुक्यातील माळेगाव पठार गावाअंतर्गत ऊंच डोंगरावर असलेली धादवडवाडीत साडे पाचशेच्या आसपास लोकसंख्या आहे. जिल्हा परिषदेला संगमनेर तर विधानसभेला अकोले तालुक्याला ही जोडलेली आहे. आजही धादवडवाडीत जायला खडतर रस्त्याशिवाय पर्याय नाही. शेती पाण्या अभावी पडीक आहे. रोजंदारी शिवाय पर्याय नाही. लोकप्रतिनिधी व पुढाऱ्यांवर अवलंबून न राहता आपणच आपल्या धादवडवाडीसाठी काही तरी केले पाहीजे, त्यासाठी सर्वजण वाडीत एकत्र आले. त्यानंतर माळेगाव पठारचे बाळशीराम भावका भोर यांनी आपल्या तलावातून धादवडवाडीला मोफत पाणी देण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणाहून थेट पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत पाईपलाईन व्दारे पाणी आणण्याचे ठरले. त्यानंतर कामाला सुरूवात झाली. प्रत्येक घरातून एक हजार रुपये वर्गणी जमा करण्यात आली. त्याचबरोबर नोकरदारांचा फंड यात्रेची वर्गणी या माध्यमातून पैसे गोळा करण्यात आले. हळूहळू कामाला सुरूवातही झाली. प्रथम जेसीबीने चर घेण्यात आला. ते काम पूर्ण झाल्यानंतर दोनशे पाईप आणण्यात आले. वाडीतील महिला, पुरूष, लहान मुले व वयोवृद्धही एकत्र आले.
आजपासून पाईपलाईनचे पाणी थेट ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत आले आहे. पाणी पाहून ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला आहे. यावेळी पेढे वाटून ग्रामस्थांनी आनंद साजरा केला. जवळपास दोन लाख रूपयांच्यावर खर्च या सर्व पाईपलाईनसाठी आला आहे. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर धादवडवाडीकरांनी आपले स्पप्न प्रत्यक्षात साकार केले आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर मात करत ग्रामस्थांनी थेट स्वखर्चातून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनच केली आहे. आज प्रत्यक्षात पाईपलाईनचे पाणी पाहून नागरिक आनंदाने फुलून गेले होते. आमचा पाणी प्रश्न सुटल्याची भावना महिलांनी बोलून दाखविली.
आपल्याकडे पाणी आहे. लोक पाणपोई उभारून पाणी देतात. मग मी का पाणी द्यायचे नाही. पाणी देताना कुठलाही फायदा न पाहता पाणी उपलब्ध असल्याने देण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया बाळशीराम भोर यांनी दिली.
ग्रामस्थांनी गावातील स्मशानभूमी, डिजिटल शाळा, स्वखर्चातून बांधली असून पुढेही आम्ही धादवडवाडी ग्रामस्थ लोकप्रतिनिधी व पुढारी यांच्यावर अवलंबून न राहता, अशा पद्धतीने कामे करतच राहू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.