अहमदनगर - शहरासह जिल्ह्यात दूरवर दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. वीज पडून श्रीगोंदा तालुक्यात एक महिला तर कर्जत तालुक्यात एक गुराखी-मेंढपाळ ठार झाल्याची घटना घडली आहे. अनेक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाटाने लोकांची एकच धावपळ उडाली.
पावसाने अनेक ठिकाणच्या चारा छावण्यांची दैना उडाली. वादळी वाऱयाने जनावरांसाठी उभारलेले बांबूची राहुट्या उखडून पडल्याने मुक्या जीवांचे हाल झाले आहेत. तर छावणीत जनावरांच्या सोबतीला असलेल्या शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. काही ठिकाणी हलका पाऊस झाला असला तरी तालुक्यांच्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
दुपारनंतर जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱयासह विजांच्या कडकडाटासह पावसाने अचानकपणे हजेरी लावली. यात श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. तर कर्जत तालुक्यातील राशीन परीसरातील चिलवडी, बारडगावसह अनेक गावांमध्ये जोरदार वाऱयासह पाऊस झाला. करमनवाडी येथे मेंढपाळ संभाजी पाटोळे हे अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाले पाथर्डी, पारनेर,श्रीगोंदा तालुक्यातही पाऊस झाला.