अहमदनगर- नगर मनमाड रोडवर देहरे (ता.नगर) येथे एमआयडीसी पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा स्लॅब कोसळून ८ कामगार जखमी झाले आहेत. जवळपास ८ हजार स्केअर फूट इतका मोठा स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.
सकाळी नऊच्या सुमारास स्लॅबचे दुसऱ्या मजल्यावरील काम सुरू असताना अकरा वाजता ही घडना घडली. या घटनेत काम करत असलेले ८ कामगार जखमी झाले आहेत. स्थानिकांनी जखमी कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. कामगार सकाळी ९ वाजता कामावर आल्यानंतर त्यांनी कामास सुरुवात केली होती, त्यानंतर काही वेळातच टाकीचा स्लॅब कोसळला.
घटनास्थळावर एमआयडीसी फायर सर्व्हिस, १०८ रुग्णवाहिका आणि एमआयडीसी पोलीस पोहोचले. तोपर्यंत स्थानिक गावकरी मदतीला पोहोचले आणि त्यांनी जखमींना तातडीने बाहेर काढून सुरक्षित जागेत हलवले. सध्या स्लॅबखाली कुणी अडकले अथवा दगावले आहे का? याचा शोध सुरू आहे. हे काम शारदा इन्फ्रास्ट्रक्चर औरंगाबाद यांच्यावतीने सुरू आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण पुढील तपास करत आहेत.