अहमदनगर - जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी येथील चुलता-पुतणे दोघे सिना नदीवरील बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. नदीच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. तुषार गुलाबराव सोनवणे (22) आणि सतिष बुवाजी सोनवणे अशी या दोघांची नावे आहेत. पाण्याचा वेग जास्त असल्याने मदत कार्यात अडथळा निर्माण होत होता. प्रशासनाच्या बारा तासाच्या अथक प्रयत्नाने दोन्ही मृतदेह सापडले. या घटनेमुळे चौंडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच तहसिलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. काल सायंकाळीच शोधकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र, पाण्याचा वेग व अंधार यामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होत होता. बारा तासांच्या अथक परिश्रमाने अखेर दोन्ही मृतदेह सापडले. दोन्ही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
सध्या परिसरात चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे. तालुक्याच्या वरच्या भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्याने सिना नदी तुडुंब भरून वाहत आहे.