अहमदनगर - देशातील वाढत्या महिला अत्याचारांबद्दल संताप व्यक्त करीत गुन्हेगारांना तातडीने शिक्षा देण्यात यावी. याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आंध्र प्रदेशमध्ये ज्याप्रकारे दिशा कायदा मंजूर करण्यात आला. त्याचप्रकारे महाराष्ट्रात कोपर्डीच्या निर्भयाच्या नावाने श्रद्धा कायदा आणावा, अशी मागणी करणार असल्याचे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी सांगितले. त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
निर्भया प्रकरणातील आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी यासाठी अण्णा हजारे यांनी २० डिसेंबरपासून मौन आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी अण्णांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही पत्रव्यवहार करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
अण्णांनी केले भूमाता ब्रिगेडचे कौतुक -
तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अण्णांची भेट घेत आंदोलनाची माहिती घेतली. यावेळी अण्णांनी भूमाता ब्रिगेडचे कार्य कौतुकास्पद आणि धाडसी आहे. तसेच त्यांनी महिला अत्याचाराविरोधात जोमाने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.