अहमदनगर- देवकृपा ट्रॅव्हल्सचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण कठड्यावर जाऊन उलटली. त्यामुळे ट्रॅव्हल्समधील चालकासह पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटातील कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्गावर घडली.
देवकृपा ट्रॅव्हल्स पुण्याहून माजलगावकडे प्रवासी घेऊन जात होती. दरम्यान, गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स करंजी घाटातील माणिकशाह पिरबाबा दर्ग्याजवळील धोकादायक वळणाजवळ पोहोचली. येथे ट्रॅव्हल्सचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने बस रस्त्याच्या कडेला संरक्षण कठड्यावर जाऊन उलटली. या घटनेत बसमधील चालकासह पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. बसमध्ये एकूण 27 प्रवासी प्रवास करत होते.
घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड, होमगार्ड अंबादास घाटे यांनी घटनास्थळी येऊन ट्रॅव्हल्सची पाहाणी केली. आणि जखमी झालेल्या चालकासह पाच प्रवाशांना उपचारासाठी रुग्णवाहिकेने पाथर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव गोल्हार, पोलीस कर्मचारी कुमार कराड, रमेश दरेकर, संभाजी आंधळे, महादेव भांड, राहूल भडांगे यांनी घटनास्थळी येऊन अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सला रस्त्याच्या बाजूला घेत घाटातील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. दरम्यान, करंजी घाटामध्ये धोकादायक वळणासह ठिक-ठिकाणी पडलेल्या मोठ-मोठ्या खड्यांमुळे येथे लहान-मोठे अपघात घडत असतात. महामार्गाचे रखडलेल्या कामामुळेच अपघाताला आमंत्रण मिळत असल्याची खंत प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा- जामखेड-नगर रोडवर अपघात; कार खड्ड्यात उलटून एकाचा मृत्यू