अहमदनगर - श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसने माजी साहित्यिक लहू कानडे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोन्ही नेत्यांनी आघाडी आणि युतीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
श्रीरामपूर मतदारसंघ हा राखीव झाल्यानंतर माजी आमदार जयंत ससाणे यांनी भाऊसाहेब कांबळेंना आमदारकीसाठी बळ दिले. मात्र, जयंत ससाणेंच्या अखेरच्यावेळी कांबळेंनी त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे ससाणे गटात नाराजी निर्माण झाली असल्याचे बोलले जाते. परिणामी, लोकसभा निवडणुकीत कांबळेंना त्यांच्याच मतदारसंघातुन कमी मते मिळाली होती. विखे पाटलांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर लोकसभेची राजकीय स्थिती बदलली होती. ती विधानसभेवेळीही पुन्हा एकदा बदलली आहे. आता भाऊसाहेब कांबळे यांनी हाती शिवबंधन बांधले आणि सेनेने त्यांना उमेदवारीही दिली आहे. त्यांच्या बरोबर तालुक्यातील विखे समर्थक आहेत. त्याचबरोबर, एकेकाळी विखेंचे विरोधक असलेले भानुदास मुरकुटे यांची ताकद आहे. कांबळेंना विखे-मुरकुटेंची साथ असली तरी ससाणे गट आणि शिवसेनेचा एक गट अद्यापही नाराज आहे. तरी, आपण केलेल्या विकासाच्या मुद्यावर कांबळे तालुका पिंजुन काढताय.
हेही वाचा - ...त्यांना कळून चुकलंय म्हणून मोदींसह अमित शाह महाराष्ट्रभर सभा घेतायेत
भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसची मोठी अडचण झाली होती. दरम्यान, गेल्या पाच-सात वर्षांपासुन श्रीरामपूर मतदार संघात संपर्क मजबूत करत साहित्यिक लहु कानडेंना बाळासाहेब थोरातांनी पक्षात घेत श्रीरामपुरातुन काँग्रेसची उमेदवारी दिली. नाराज ससाणे गट तसेच राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आता लहु कानडेंच्या पाठीशी आहेत. सुशीक्षित आणि सरकार दरबारी काम करवून घेण्याचे कसब असणारा उमेदवार हे मुद्दे घेवून कानडे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.
हेही वाचा - बाळा..मी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, पवारांची मुख्यमंत्र्यांना मार्मिक समज
या मतदार संघात 11 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. यात भाऊसाहेब शंकर पगारे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना),अमोलिक गोविंद बाबुराव (बहुजन समाज पक्ष), अशोकराव रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सुधाकर भोसले (बहुजन मुक्ती पक्ष), सुरेश एकनाथ जगधने (एआयएमआयएम), रामचंद्र नामदेव जाधव(अपक्ष), भिकाजी राणु रणदिवे (अपक्ष), सना मोहमंद अली सय्यद (अपक्ष), डॉ. सुधीर राधाजी क्षीरसागर (अपक्ष) यांचा सावेश आहे. श्रीरामपुरात स्थानिक की बाहेरचा, शिक्षीत की अशिक्षीत अशा मुद्द्यांच्या आधारे प्रचाराचा धुराळा उडत असुन लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.