अहमदनगर - पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याबाबतचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या वक्तव्यावरुन चांगलेच वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री त्यांचे वक्तव्य मागे घेत नाहीत तोपर्यंत, शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. आजपासून हा बंद सुरु करण्यात येणार आहे. मात्र, मंदिर, रुग्णालये सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
साईबाबांच्या जन्मभूमीच्या उल्लेखाविरोधात शिर्डी ग्रामस्थांनी चिड व्यक्त केली आहे. आजपासून शिर्डी बेमुदत बंदची हाक दिली असून, त्यासाठी द्वारकामाईसमोर ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी शिर्डीसह पंचक्रोषीतील ग्रामस्थांसह शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते. ग्रामसभेत साई संस्थानचे पुजारी बाळाकृष्ण जोशी यांनी साईचरीत्रातील गोष्टींच्या नोंदीची माहीती दिली. त्याचबरोबर साईबाबांच्या समकालीन भक्तांनीही त्यांच्या पुर्वजांकडे साईबाबांनी जन्मस्थळाचा उल्लेख केला नसल्याने पाथरीकरांचा दावा खोटा असल्याचे ठाम मत मांडले. काही प्रवृत्ती जन्मस्थळाचा वाद निर्माण करत असल्याचे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पाथरीच साईमंदीर अनेक मंदीरांपैकीच एक आहे. या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी शासनाची अधिकृत भूमिका जाहीर करावी असेही विखे पाटील म्हणाले.
शिर्डीबरोबरच राहाता, नांदुर्खी, एकरुखे, अस्तगाव , सावळीविहीर, निघोज, नपावाडी,केलवड, रुई ही गावेही बंद पाळणार आहेत. या गावचांही शिर्डीबंदला पाठींबा आहे. पाथरीकर 29 पुरावे असल्याचा दावा करत आहेत. पाथरीकरांनी शिर्डीला यावे त्यांच्या विरोधात आम्ही 30 पुरावे देतो, असे आवाहन शिर्डीकरांनी केला आहे. आजपासून शिर्डी बेमुदत बंदला सुरुवात होणार आहे. सकाळी १० वाजता शिर्डीतून सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या ग्रामसभेच शिर्डीकरांनी चार ठराव समंत केले.
पाथरीला निधी देण्यास विरोध नाही केवळ जन्मभूमी उल्लेख करण्यास विरोध. इतर आठ जन्मस्ळाच्या दाव्यात तथ्य नाही मुख्यमंत्र्यांनी पाथरी जन्मस्थळाबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे. जो पर्यंत वक्तव्य मागे घेत नाहीत तोपर्यंत शिर्डी बेमुदत बंद राहणार. भाविक देव आहेत त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार असल्याचे शिर्डीकरांनी सांगितले.