शिर्डी - आज कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने साई मंदिरात ग्रहण काळात मंदिरातील पुजाऱ्यांकडून मंत्रोच्चाराचे पठण सुरू आहे. मात्र आज गृहणामुळे दुपारी १२ वाजता नियमितपणे होणारी मध्यान आरती ग्रहण सुटल्यानंतर दुपारी २.३० वाजता केली जाणार आहे. आज मंत्रपठणाच्या कालावधीत साईंच्या मूर्तीला पांढरी शाल परिधान करण्यात आली असून मूर्तीस रुद्राक्षाची माळ चढविण्यात आली आहे. तर साई समाधीला तुळशीची पाने आणि दर्भ दुर्वांनी झाकण्यात आले आहे.
आज जगभरातील विविध देशातून सूर्य ग्रहण पाहण्याचा योग आहे. भारतातही हे ग्रहण काही ठिकाणी खंडग्रास तर काही ठिकाणी कंकणाकृती स्वरूपात दिसणार आहे. ग्रहण काळात शिर्डीतील साईमंदिरात मंत्रपठण सुरू करण्यात आले आहे. मंदिरात साई समाधीवर असलेल्या सोन्याचा पादुकांवर सातत्याने पुजाऱ्याकडून जल धारा सोडल्या जात आहेत. तर ग्रहण काळात गुरुस्थान द्वारकामाई चावडी इतर मंदिरेही बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने साईबाबा संस्थानकडून पारंपरिक पद्धतीने ग्रहण काळात पूजा करण्यात येत आहे. तर ग्रहण संपल्या नंतर साई मूर्तीला मंगल स्नान घालण्यात येईल. आज दुपारी 12 वाजता होणारी साईंची मध्यान आरती आज दुपारी 2.30 वाजता होणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी दिली.
एरवी भक्तांना या काळात मंदिरात साईच्या मुख्य दर्शनासाठी प्रवेश दिला जातो. मात्र गेल्या 17 मार्च पासून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.