अहमदनगर - चार संशयित चोरटे सोनई बसस्थानक समोरील एका हॉटेलात वडा-पाववर ताव मारत होते. त्यांनी आणलेल्या वाहनावर तरूणांच्या संशयाच्या नजरा पडल्या. आपण पकडले जावू या शक्यतेने चारहीजण गडबडीत मोटार चालू करून पळाले. ग्रामसुरक्षा दलाचे युवक व पोलिसांनी चारपैकी तिघांना मोरया चिंचोरे शिवारात पाठलाग करुन ताब्यात घेतले आहे.
चार-पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न -
आठ दिवसांपासून सोनईत चोरट्यांच्या धुमाकूळ सुरु होता. चार-पाच ठिकाणी त्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. महावीर पेठेतील कृष्णा चांडक या युवकावर त्यांनी हल्ला केल्यानंतर ग्रामस्थांची धाकधूक वाढली होती. चार दिवसांपूर्वी गावातील दिडशे तरुणांनी ग्रामसुरक्षा दल स्थापन करुन पोलिसांच्या बरोबरीने रात्रीची गस्त सुरु केली होती. रविवार(ता.१३) पासून मुळा कारखाना व एज्युकेशनचे सुरक्षा कर्मचारी गस्तीसाठी सक्रीय झाले होते.
मंडळाचे युवक होते मागावर -
ग्रामस्थांच्या सांगण्यावरून निळ्या रंगाची एक टाटा सफारी मोटार संशयाच्या फेऱ्यात होती. हीच मोटार आज सकाळी ९.३० वाजता एका युवकाने बसस्थानक परीसरात बघितली. एकमेकांना संपर्क करण्यात आला. युवकांची हालचाली लक्षात आल्यानंतर संशयित मोटारीत बसून नव्या वांबोरी रस्त्याने गेले. महेश मंडळाचे महेश म्हसे, शैलेश दरंदले, सचिन चांदघोडे त्यांच्या मागावर होते. यश मित्र मंडळाचे राजेंद्र गुगळे, अनिल दरंदले, विजय मनोरे तसेच सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे व पथकाचा ताफा मागून निघाला.
पोलीस व युवकांनी पाठलाग करून घेतले ताब्यात -
मोरया चिंचोरे शिवारातील एका शेतात मोटार (ए.पी.०४ सी.जी.२००७) लावून सर्व संशयित उसाच्या शेतातून पळत असताना पोलीस व युवकांनी पाठलाग करून तिघास ताब्यात घेतले. अन्य एकाचा शंभरहून अधिक युवक व पोलीस यंत्रणा शोध घेत आहे. तीन संशयित पकडल्याची वार्ता गावात समजतात ग्रामस्थांत असलेले भीतीचे दडपण हटले आहे.
पोलीसी खाक्यानंतर चोऱ्याशी संबंधित आहेत की नाही होईल निष्पन्न -
गावाची झोप उडविणारे आहेत तरी कसे, हे पाहण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर बघ्याची गर्दी झाली होती. पोलीसी खाक्यानंतर त्यांची नावे व हेच सोनईतील चोऱ्याशी संबंधित आहेत की नाही हे निष्पन्न होईल. दरम्यान हे डिझेल चोरी प्रकरणातील असल्याची माहिती समोरे येते आहे. या प्रकरणात आणखी तिघांना ताब्यात घेतल्याने त्यांची संख्या सहा झाली आहे.