अहमदनगर - शहरातील सथ्थ्या कॉलनी भागामध्ये बांधकाम सुरू असताना घराची भिंत कोसळल्याने ३ मजुरांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एक मजूर जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. घटनेची माहिती अग्निशमन दलाला आणि पोलिसांना मिळताच अग्निशमन दलाचे जवान तसेच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सथ्थ्या कॉलनीत एका घराचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी काही मजूर काम करत होते. त्यावेळी अचानक निर्माणाधीन भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. त्यात रोहन विजय फुलारे (वय-२२, बुरुडगाव, ता.नगर), राहुल विजय फुलारे (वय-२६, बुरुडगाव, ता.नगर), गोविंद शंकर शिंदे (वय-३२, बुरुडगाव) हे भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यानंतर तत्काळ तेथे पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ३ जणांना बाहेर काढले. यात दोघांचा आधीच मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला होता. जखमी मजूराला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोतवाली पोलीस दुर्घटना का घडली याची माहिती घेत आहेत.