अहमदनगर- जिल्ह्यातील एमआयडीसी तसेच राहुरी हद्दीत रात्रीच्या वेळी मंदीरात चोरी करणाऱ्या टोळीला राहुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. 84 हजारांचा मुद्देमालासह तिघांना गजाआड केले आहे. विषेश म्हणजे एका आरोपीला एक हात नसताना देखील एवढी मोठी चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
20 मार्च रोजी राञी गस्त घालत असताना नगर मनमाड महामार्गाने पहाटे संशयित व्यक्तींची टोळी फिरत असल्याची माहिती राहुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एका आरोपीला पकडण्यात पोलीसांना यश आले होते. तर इतर आरोपी अंधाराचा फारदा घेत पसार झाले होते. अधिक चौकशीनंतर संदीप बबन बर्डे, सचिन माळी, संदिप गांगुर्डे, शंकर बडे, रमेश माळी हे आरोपी फरार असल्याचे समोर आले.
या आरोपींनी राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील मळगंगा मंदिर व बल्हाळआई देवी मंदिर , मानोरी येथील रेणुका माता मंदिर, देवळाली प्रवरा येथील मंदिर तसेच एमआयडीसी पोस्ट हद्दीतील मंदिरात धाडसी चोरी केलेली होती. त्यांच्याकडून चांदिचा मुकुट सोन्याची नथ, मनी मंगळसूत्र, एक मोटारसायकल असा 84 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ हे करत आहेत.