अहमदनगर (शिर्डी) - साईबाबा संस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही (गुरुवार दिनांक २२ जुलै २०२१) ते (शनिवार दिनांक २४ जुलै २०२१)या काळात गुरुपौर्णिमा उत्सव येत आहे. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली आहे.
२२ जुलै ते दि.२४ जुलै २०२१ या कालावधीत साजरा होणार
गेल्या वर्षी जगभरात व देशात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे साई मंदिर बंद करण्यात आले होते. त्यानंतर दि.१४ नोव्हेंबर २०२० रोजीच्या शासन आदेशान्वये दि. १६ नोव्हेंबर २०२० पासून साई मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही घालून दिलेल्या नियमांवर उघडण्यात आले होते. परंतु, सध्या पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यामध्ये धार्मिक स्थळे, सामाजिक ठिकाणे आदि ठिकाणी गर्दी होवू नये अथवा करु नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर साई संस्थानच्या वतीने दि. ०५ एप्रिल २०२१ पासून साई मंदिर दर्शनासाठी भक्तांना बंद ठेण्यात आले आहे. त्यामुळे दि.२२ जुलै ते दि.२४ जुलै २०२१ या कालावधीत साजरा करण्यात येणारा गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे.
गुरुपौर्णिमा उत्सवचा प्रथम दिन
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथम दिवशी गुरुवार दिनांक २२ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजता साई मंदिरात काकड आरती, ०५.०० वाजता पोथीची मिरवणूक, ०५.१५ वाजता व्दारकामाई श्री साई सच्चरिताचे अखंड पारायण, ०५.३० वाजता साईंचे मंगलस्नान, सकाळी ०६.०० वाजता साईंच्या पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता साईबाबांची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायं. ०७.०० वाजता साईबाबांची धुपारती होईल. रात्री १०.३० वाजता साईबाबांची शेजारती होईल. या दिवशी श्री साई सच्चरित अखंड पारायणाकरीता व्दारकामाई मंदिर आतील बाजूने रात्रभर खुले ठेवण्यात येईल.
उत्सवचा मुख्य दिवस
गुरु पौरर्णिमेच्या उत्सवाच्या मुख्य दिवशी शुक्रवार दिनांक २३ जुलै रोजी सकाळी ०४.३० वाजता साईची काकड आरती, ०५.०० वाजता अखंड पारायण समाप्ती व साईबाबांचा फोटोची व पोथीची मिरवणूक, ०५.२० वाजता साईंचे मंगलस्नान, सकाळी ०६.०० वाजता साईबाबांची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता साईबाबांची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत कीर्तन कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ०७.०० वाजता साईबाबांची धुपारती होईल. रात्री १०.३० वाजता शेजारती होईल.
उत्सवाची सांगता
उत्सवाच्या सांगता दिनी शनिवार दिनांक २४ जुलै रोजी पहाटे ०४.३० वाजता साईची काकड आरती होईल. सकाळी ०५.०० वाजता मंगलस्नान, सकाळी ०६.३० वाजता पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १०.०० वाजता गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वाजता माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता धुपारती होईल. रात्री १०.३० वाजता शेजारती होईल.तसेच उत्सव कालावधीत पदयात्री साईभक्तांनी कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये. तसेच, संस्थानला सहकार्य करावे असे आवाहन ही बगाटे यांनी केले आहे.