शिर्डी (अहमदनगर) - गेल्या दहा महिन्यांपूर्वी वैशाली टाके (Vaishali Take) यांच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले. घरामध्ये पत्नीसह ९ महिन्याच्या लहान मुलाला सोडून आपला मुलगा देवाघरी गेला. त्यामुळे वैशालीचे सासू-सासरे अधिकच चिंतेत होते. तरुण सुनेच कसं होणार? हा सवाल त्यांना सतावत होता. तसेच वैशालीच्या आई-वडिलांना देखील मोठी काळजी लागली होती. आपल्या मुलीला नऊ महिन्याचं बाळ आहे. तिच्या पतीचे कमीवयात कोरोनाच्या लाटेत निधन झालं. मुलीचं कसं होणार ही काळजी आई-वडिलांनाही लागली होती. त्यामुळे दोन्ही परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशातच किशोर ढुस (Kishor Dhus) याने वैशालीला साथ देऊन तिच्यासोबत लग्न करून तिच्या लहान बाळाला देखील त्याने स्वीकारलं.
समाजापुढे आदर्श ठेवला
किशोर ढुस हे अहमदनगर येथील नोबल रुग्णालयात (Noble Hospital Ahmednagar) नर्सिंग स्टाफमध्ये काम करत आहेत. कोरोनामुळे अनेकांचे जीव गमावल्याचे पाहिले आहे. कोरोनामध्ये गेलेल्या व्यक्तीनंतर परिवाराची परिस्थिती कशी वाईट होते? हे त्यांनी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे त्यांनी कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलेसोबत लग्न करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
मला आणि मुलाला मोठा आधार
कोरोनामुळे पतीचे निधन (Husband Died In Covid Wave) झाल्याने आई-वडील आणि सासू-सासरे अशा दोन्ही परिवारावर संकट कोसळलं होतं. सर्वांना माझी चिंता होती की, तरुण मुलीचे पुढे कसं होणार? सगळ्यांना माझी काळजी वाटत होती. मला छोटा मुलगा आहे. अशातच किशोर यांनी माझ्यासह लहान मुलाचा स्वीकार करत माझ्यासोबत लग्न करून माझ्या परिवारासह मला आणि मुलाला मोठा आधार दिला, असल्याचं यावेळी वैशाली टाके म्हणाल्या.
प्रपंच उध्वस्त झाले असल्याचं मी जवळून पाहिलं
अहमदनगर येथील नोबेल रुग्णालयामध्ये नर्सिंग स्टाफ म्हणून काम करतो. कोरोनामुळे अनेकांचे प्रपंच उध्वस्त झाले असल्याचं मी जवळून पाहिलं आहे. अनेक मुली विधवा झाल्या आहेत. काहींच्या सुना विधवा झाल्या तर, काहींच्या मुली विधवा झाल्या. त्यामुळे मी ठरवलं कुणाचा तरी आधार बनायचं. वैशाली टाके ही माझ्या नातेसंबंधामध्ये असल्याने तिच्या सोबत लग्न करायचं मी ठरवलं आणि या लग्नाला माझ्या घरच्यांनीही साथ दिली. वैशालीला नऊ महिन्याच बाळ असून, मी त्या बाळाला ही माझं नाव देऊन वैशाली सोबत लग्न केलं आहे. हाच आदर्श इतर तरुणांनी घ्यावा असे यावेळी किशोर ढुस यांनी सांगितलं.