अहमदनगर - आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती म्हणजे अनुयायांसाठी एक मोठा उत्सव असतो. देशात कोरोना लॉकडाऊन असल्याने कोणतेही सण-उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जयंतीदिनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी आलेल्या महिलेला पोलिसांनी रोखले. त्या महिलेनेही बाबासाहेबांनीच हे कायदे केले आहेत आणि त्यांचा मी आदर करते, असे म्हणत माघार घेतली.
अत्यावश्यक असलेला भाजीपाला आणण्यासाठी आलेल्या एका महिलेला डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला जयंतीदिनी एकही हार घातलेला न दिसल्याने गहिवरून आले. त्यामुळे ही महिला एक पुष्यहार घेऊन आली. मात्र, लॉकडाऊनमुळे घातलेले नियम आडवे आले. पुतळ्याभोवती बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी या महिलेला सद्य परिस्थितीची जाणीव करून देत हार घालू दिला नाही. यावेळी महिलेनेही कोणताही गोंधळ न घालता बाबासाहेबांनी केलेले कायदे श्रेष्ठ असल्याचे मान्य केले.