अहमदनगर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासन वारंवार करत आहे. तरीही लोक गर्दी करताना दिसत आहेत. शहरात एकाचवेळी मोठी गर्दी करणाऱ्या शहरी नागरिकांसाठी ग्रामीण भागातील ग्रामस्थ कृतीतून आदर्श निर्माण करत आहेत.
कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे गावगावचे आठवडे बाजार बंद झाले असल्याने, ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळणे अवघड झाले आहे. कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये दर मंगळवारी आठवडी बाजार मोठ्या प्रमाणावर भरत असतो. पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने सध्या सर्व आठवडी बाजार बंद केले आहेत. बाजार भरला जात नसल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. जनतेची हीच समस्या लक्ष्यात घेता राशीन ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेमध्ये दररोज सकाळी 8 ते 11 या वेळेमध्ये भाजी मंडई सुरू करण्यात आली आहे. फक्त राशीनमधील व्यापाऱ्यांनीच भाजी मंडईमध्ये दुकाने लावावीत व राशीनमधील नागरिकांनीच खरेदीसाठी यावे, असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.