अहमदनगर - राहुरी तालुक्यात कोंढवड येथील मुळानदीवरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. हा पुल वाहतूकीसाठी धोकादायक झाला आहे. या पुलाची तात्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी कोंढवड, शिलेगाव व पंचक्रोशितील ग्रामस्थांनी केली आहे.
दुरुस्तीची मागणी
कोंढवड येथील मुळानदीवरील पूल पूर्व भागासाठी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा पूल आहे. या पुलाला तांदुळवाडीच्याबाजूने मोठे भगदाड पडले आहे. हा पूलच शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे भगदाड वरून जरी लहान दिसत असले तरी आतून पोकळी मोठी आहे. तसेच या पुलावरून सध्या ऊस वाहतुकीची वाहने मोठी कसरत करून जात आहेत. या भगदाडामुळे एखादा अनर्थ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. तरी या पुलाची संबधित विभागाने पाहणी करुन दुरूस्ती करावी, अशी मागणी सरपंच आशादेवी म्हसे, शिलेगावचे सरपंच संदिप म्हसे, उत्तमराव म्हसे, साहेबराव म्हसे, संभाजी पेरणे, राहुल म्हसे, विजय कातोरे, दिलीप म्हसे भाऊसाहेब देवरे, इंद्रभान म्हसे, डॉ. दिलीप म्हसे, तानाजी नेहे, लक्ष्मण म्हसे रमेश म्हसे, पोपट म्हसे, दत्तू माळवदे, सुनील हिवाळे, रवींद्र म्हसे, शिवाजी औटी, पांडू म्हसे, संजय म्हसे यांनी केली आहे.