शिर्डी (अहमदनगर) - साईबाबांच्या मंदिरात कोरोनामुळे मार्च महिन्यापासून भक्तांचा राबता बंद होऊन मंदिराच्या दानपेटीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या पगारांसह अन्य प्रासंगिक खर्चावर परिणाम होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत देणगीवर तब्बल 90 टक्के परिणाम झाला असल्याची माहिती लेखापाल दिलीप घोरपडे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीत 17 मार्चपासून मंदिर बंद आहे. केंद्र सरकारने देवस्थान उघडण्यास परवानगी दिली असली तरी महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पाहता राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली नाही. यामुळे भक्तांना धार्मिक स्थळी जाता येत नाही परिणामी देवस्थानात भाविकांकडून येणाऱ्या देगण्या घटल्या आहेत. मागील वर्षी 17 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत भाविकांकडून तब्बल 120 कोटी रुपयांची देणगी रोख स्वरुपात प्राप्त झाली होती. मात्र, या वर्षी 17 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत साईसंस्थानला केवळ 13 कोटीची देणगी तिही ऑनलाइन स्वरुपात प्राप्त झाली आहे.
देणगी व्यतिरिक्त साईबाबा संस्थानचे भक्त निवास, व्ही.आय.पी. पासेस, लाडू प्रसाद, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या माध्यमातूनही ट्रस्टला उपन्न मिळतो. हे उत्पन्न दिवसाकाठी 50 ते 60 लाख तर वर्षाकाठी तब्बल 600 कोटी रुपयांचा उत्पन्न साई संस्थानला मिळतो. मात्र, टाळेबंदीमुळे मंदिर बंद असून भक्तच नसल्याने उत्पन्नाचे सर्व साधन बंद आहेत. केवळ ऑनलाइन देणगी व रुग्णालयाच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नावरच मंदिर समितीचा पूर्ण खर्च सुरू आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने मागील दीड ते दोन महिन्यांपासून अनेक कामगारांचे वेतनही थकीत आहे.
मंदिरासह मंदिर व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर अवलंबून असलेले व्यवसायही ठप्प आहेत. यामध्ये सातशेहून अधिक लहान-मोठे हॉटेल्स, फुल व प्रसादाची दुकाने बंद असल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मंदिरासाठी लागणाऱ्या गुलाब, लिली, झेंडूच्या फुलांच्या शेतीवरही याचा परिणाम झाला आहे. त्याचबरोबर टूर्स व ट्रॅव्हसचा व्यवसायही बंद असल्याने त्यांची वाहने धुळखात पडली आहेत. शिर्डीजवळ असलेल्या निमगाव या गावात अनेकांचा साईबाबांची मूर्ती बनविण्याचा व्यवसाय आहे. मात्र, भक्तच नाहीत तर मूर्ती घेणार कोण, असा प्रश्न मूर्तीकारांना पडला आहे. त्यामुळे अनेक व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. मंदिर व भाविकांवर अवलंबून असलेल्या व्यवसाय बंद असल्याने शिर्डीतील सुमारे 10 कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे लवकरातलवकर मंदिरे सुरू करावीत, अशी मागणी व्यवसायिक व मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे.