अहमदनगर- स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्या बजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या टेम्पोला ग्रामस्थांनी पकडल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. टेम्पोतून येळपणे गावतील स्वस्त धान्य दुकानातील मालाची वाहतूक होत होती. ग्रामस्थ्यांच्या सजगतेमुळे टेम्पोला पकडण्यात यश आले आहे. टेम्पोला बेलवाडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येळपणे येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य आयशर टेम्पोने काळ्या बाजारात विक्रीसाठी जात होते. दरम्यान, येळपणे व पिसोरे येथील अनिल वीर, सतीश वीर, उपसरपंच गणेश पवार, दत्तात्रय लकडे यांच्यासह ४ जणांनी या टेम्पोला पकडले. त्यानंतर, या सर्वांनी टेम्पोसह चालक महावीर गांधी (रा.पारगाव) यास बेलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेची माहिती मिळताच श्रीगोंद्याच्या प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार यांनी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना धान्य दुकानात पाठवले व पंचनामा करवून घेतला. तसेच, काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या ७० गोण्या गहू तसेच १८ गोण्या तादळासह टेम्पो ताब्यात घेतला. याप्रकरणी येथील धान्य दुकानदार रावसाहेब पवार, तसेच टेम्पो चालक महावीर गांधी व टेम्पो मालक यांच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा- खासदार सुजय विखेंनी घेतली इंदुरीकर महाराजांची भेट